नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या गळाभेटीवरुन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, राहुल गांधी यांनी लोकसभेत चिपको आंदोलन सुरु केले आहे. तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वास दर्शक ठरावावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ठरावाला विरोध करत आपल्या सरकारची बाजू मांडली. आज भारतीय जनता पार्टी सर्वात बलवान पक्ष बनला असून आमच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्यासाठीही अनेक पक्षांना एकत्र प्रयत्न करावे लागले. कोणत्याही एका पक्षाकडे हा ठरावही सादर करण्याची ताकद नाही.
भाषणाच्या सुरुवातीसच त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वक्तव्याचा दाखला देत काँग्रेस आणि विरोधी पक्षांची स्थिती सांगितली. एकेकाळी राजीव गांधी यांनी आमच्या पक्षाला हम दो हमारे दो अशा शब्दांमध्ये संबोधले होते. आमचे तेव्हा दोनच खासदार होते पण आज सर्व परिस्थिती बदलली, काळ बदलला. आज आमच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्यासाठी काँग्रेसच काय कोणत्याही पक्षाला स्वबळावर उभे राहाता येत नाही. अनेक पक्षांना एकत्र येऊन आमच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणावा लागला. इतकी त्यांची स्थिती वाईट झाली, अशा शब्दांमध्ये राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्ष किती कमकुवत झाले आहेत हे सांगितले.
भारतीय जनता पार्टीला बदलत्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात सहकार्य आणि मते मिळत आहेत. केरळ असो वा त्रिपुरा सर्वत्र आमचे संख्याबळ वाढत गेले आहे. हे आमच्या वाढत्या यशाचे लक्षण आहे. पंधरा वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणला गेला होता. मात्र नंतरच्या दहा वर्षांमध्ये काँग्रेसप्रणित सरकाकडे संख्याबळ होते त्यामुळे आम्ही कधीही अविश्वासदर्शक ठराव आणला नव्हता, कारण डॉ. मनमोहन सिंह यांच्याकडे पुरेसे बहुमत होते हे आम्हाला माहिती होते. हा समजूतदारपणा विरोधी पक्षांनी दाखविण्याची गरज होती. आताही या आमच्या सरकारकडे पुरेसे संख्याबळ आहे तरिही अविश्वासदर्शक ठराव स्विकारून आम्ही सशक्त लोकशाहीच्यादृष्टीने योग्य निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. तसेच स्वतंत्र भारताच्या इतिहासात काँग्रेसेतर (एकाच) पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली यातून आमच्यावरील जनतेचा विश्वास दिसून येतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.
भाजपाविरोधात काही पक्ष एकत्र येत आहेत. त्या पक्षांमध्ये आपसांतही एकी नाही. त्यांचे नेतृत्व कोण करेल हा प्रश्न आहेच. त्यांच्यामध्ये नेतृत्त्वाचा प्रश्न आला की ''गई भैंस पानी में'' अशी स्थिती निर्माण होईल अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधी पक्षांची फिरकी घेतली. 2030मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होईल असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. आज जीडीपीची गती जास्त असून चलनवाढीचा दर कमी झाला आहे. याचाच अर्थ भारताची आर्थिक स्थिती मजबूत आहे.