नवी दिल्ली - केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेली शिवसेना अविश्वास प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी काय भूमिका घेणार, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. अविश्वास प्रस्तावाचं जे नाटक चाललंय, त्या झमेल्यात शिवसेनेला पडायचं नाही, असं आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून पक्षाच्या संसदीय मंडळाला भूमिका कळवली आहे. देशातील वातावरण, जनतेच्या तीव्र भावना आम्हाला माहीत आहेत. परंतु, अविश्वास प्रस्तावाचं नाटक, गोंधळ, गदारोळ, चर्चा या झमेल्यात आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे आम्ही तटस्थ राहणार आहोत, सभागृहात जाणार नाही, मतदान करणार नाही, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्यानंतर शिवसेनेनं आपल्या खासदारांना 'व्हिप' बजावला आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूने मतदान करतील, अशा बातम्या कालपासून येत होत्या. परंतु, असा कुठलाही व्हिप पक्षाने बजावला नसल्याचा खुलासा सेनेकडून करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आपल्या सभांमधून आणि मुखपत्रातून मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधणारी शिवसेना सरकारच्या बाजूने उभी राहते की विरोधात, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. आज सकाळी शिवसेनेच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. त्यावेळी उद्धव यांनी अगदीच सावध खेळी करत, मतदानावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय खासदारांना कळवला आहे.