नवी दिल्ली – गेल्या २ दिवसांपासून लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. मणिपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी संसदेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यावर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत आज मतदान पार पडेल. मोदी सरकारसाठी ही परीक्षा आहे तशीच महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या खासदारांसाठीही अग्निपरीक्षा आहे.
अविश्वास प्रस्तावावर कुणाच्या बाजूने मतदान करायचं ही द्विधा परिस्थिती शिवसेना खासदारांची आहे. आज शिवसेनेच्या दोन्ही गटाने व्हिप जारी केला आहे. याबाबत शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे म्हणाले की, राजन विचारे यांचा व्हिप लागू होत नाही. लोकसभेच्या अध्यक्षांनी गटनेता म्हणून मला आणि व्हिप म्हणून भावना गवळी यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे ऑनरेकॉर्ड मी गटनेता आणि भावनाताई व्हिप आहेत. त्यामुळे शिवसेनेत कुठलाही गट नाही. सर्व १९ खासदारांना आमचा व्हिप लागू होणार आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदेंना मान्यता दिली. भावना गवळी यांनी काढलेला व्हिप जर ठाकरे गटातील खासदारांनी पाळला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. याबाबत लोकसभा अध्यक्षांकडे अधिकार आहेत असंही राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे. तसेच २५ वर्ष एनडीएला झालीय. बाळासाहेबांनी ही युती बनवली होती मात्र उद्धव ठाकरेंनी ही युती तोडली. परंतु पुन्हा आम्ही शिवसेना म्हणून एनडीएमध्ये सहभागी झालोय त्याचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने बजावला व्हिप
लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने खबरदारी घेतली आहे. सभागृहात मोदी सरकारकडे बहुमत असल्याने भाजपाला चिंता नाही. परंतु खबरदारी म्हणून सर्वांना सूचित केले आहे. आज सरकारच्या अग्निपरीक्षेवेळी महाराष्ट्रातील दोन पक्षांची अवघड परिस्थिती झाली आहे. एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे आणि दुसरीकडे शरद पवार-अजित पवार अशा २ गटात शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष विभागले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने व्हिप जारी केला आहे. त्यामुळे आता हे खासदार कुणाच्या बाजूने मतदान करतात हे पाहणे गरजेचे आहे.