नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट आणि नंतर डोळा मारण्याचा प्रकार लोकसभेच्या प्रतिष्ठेला शोभणारा नाही, अशी कानउघडणी सभापती सुमित्रा महाजन यांनी केली.
पंतप्रधानपदाची एक प्रतिष्ठा असते. आपणही खासदार म्हणून कसं वागायचं, याबाबतही काही पथ्यं असतात. गळाभेटीला माझा विरोध नाही, मीही एक आई आहे. पण ज्या पद्धतीने सगळा प्रकार घडला तो गैर होता, अशी समज त्यांनी सर्वच खासदारांना दिली. राहुल गांधी हे माझे शत्रू नाहीत, तेही मला मुलासारखेच आहेत. त्यांचं नेतृत्व अवश्य फुलू दे, पण चूक दाखवून देणं, पैलू पाडणं हे आई म्हणून माझंही काम आहे, असं सांगत, राहुल यांच्या गळाभेटीचं समर्थन करणारे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचेही त्यांनी कान टोचले.
तुम्ही सगळ्यांनी एकत्र प्रेमाने राहावं अशीच माझी इच्छा आहे. पण, लोकसभेत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून बसले होते. त्या पदाचा एक मान आहे, प्रतिष्ठा आहे. राहुल यांनी त्यांना येऊन मिठी मारणं आणि नंतर डोळा मारणं हा प्रकार अत्यंत अशोभनीय होता. हे काय नाटक सुरू आहे, असंच मला त्या क्षणी वाटलं. त्यामुळे, या सदनाची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न यापुढे प्रत्येक सदस्यानं करावा, असं त्यांनी नमूद केलं.
अशी झाली मोदी-राहुल गळाभेट!
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. पण भाषण संपवल्यानंतर लोकसभेत अद्भुत चित्र पाहायला मिळालं. 'काँग्रेस ही एक भावना आहे. ती भावना तुमच्याही मनात आहे. मी तुम्हाला काँग्रेस बनवेन, असं म्हणून राहुल यांनी भाषण संपवलं आणि ते वेलमधून थेट मोदींच्या खुर्चीकडे गेले. त्यांनी मोदींना आलिंगनासाठी उभं राहण्याची विनंती केली. पण, आचारसंहिता, शिष्टाचार लक्षात घेऊन ते उभे राहिले नाहीत. त्यामुळे राहुल यांनी स्वतःच पुढे होत त्यांना मिठी मारली.
काय म्हणाले राहुल...
सगळ्या विरोधकांना आणि तुमच्यातल्या काही लोकांना घेऊन आम्ही पंतप्रधानांना हरवणार आहोत. माझ्या मनात पंतप्रधाबद्दल राग, द्वेष नाही. उलट, मोदी आणि भाजपाचा मी आभारीच आहे. त्यांनीच मला काँग्रेसचा अर्थ सांगितला. भारतीय असण्याचा अर्थ सांगितला. धर्म शिकवला. शिवाचा अर्थ सांगितला. हिंदू असण्याचा अर्थ सांगितला. यापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. तुमच्यासाठी मी पप्पू आहे. तुम्ही मला कितीही शिव्या देऊ शकता, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल किंचितही राग नाही, द्वेष नाही. मी काँग्रेस आहे. हे सगळे काँग्रेस आहेत. काँग्रेस या भावनेनंच देश बनवला आहे. ही भावना तुमच्याही मनात आहे. मी तुम्हाला काँग्रेस बनवेन.