नवी दिल्ली- 1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी अविश्वासदर्शक ठरावाचा पहिल्यांदा सामना केला. तेव्हा त्यांचे सरकार केवळ एका मताने पराभूत झाले होते. मात्र 2003 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी याचे प्रत्युत्तर विरोधकांना दिले. 2003 साली झालेल्या अविश्वास दर्शक ठरावाच्या चर्चेमध्ये त्यांनी आपल्या सरकारचे मोठे बहुमत असल्याचे दाखवून दिले.
का मांडला गेला ठराव?- भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र काही काळानंतर ते पुन्हा मंत्रिमंडळात आले. या घटनेचा निषेध म्हणून विरोधक सतत लोकसभेतून सभात्याग करत असत. त्यामुळे काँग्रेसने अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारविरोधात अविश्वास दर्शक ठराव लोकसभेत मांडला.
मतदानात काय झाले?- विरोधीपक्षनेत्या सोनिया गांधी, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी भाषणे केल्यानंतर या ठरावावर मतदान घेण्यात आले. या मतदानात ठरावाच्या बाजूने केवळ 186 खासदारांनी मतदान केले तर सरकारच्या बाजूने 312 खासदारांनी मतदान केले. त्यामुळे विरोधकांचा मोठा पराभव करण्याची व आपल्या बाजूने लोकसभेचा विश्वास आहे हे दाखविण्याची मोठी संधी वाजपेयी यांच्याकडे चालून आली.
त्या पुढच्या सरकारांमध्ये काय झाले?- अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर सलग डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये संपुआची सलग दोन सरकारे 10 वर्षे कार्यरत होती. 2008 साली पहिल्या संपुआ सरकारचा पाठिंबा डाव्यांनी काढून घेतल्यावर डॉ. मनमोहन सिंह यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता.