पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सध्या संसदेत चर्चा सुरू आहे. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, आज अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोतलाना गृहमंत्री अमित शाहा यांनी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच राजीव गांधी यांनी सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराबाबत खंत व्यक्त करताना दिलेल्या रुपयाचं उदाहरण देत काँग्रेसची कोंडी केली.
अमित शाह म्हणाले की, एकदा या देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी सांगितलं होतं की, मी दिल्लीतून एक रुपया पाठवला तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यातील केवळ १५ पैसेच पोहोचतात. तेव्हा नवे नवे राजकारणात आले होते, प्रामाणिक व्यक्ती होते, बोलून गेले. पण मी आता पुढे विचारतो की, ते ८५ पैसे पळवायचा कोण. ८५ पैसे तेच लोक घेऊन जायचे ज्यांना या पैशांमध्ये कटकी आणि बटकी करायची होती, असा टोला अमित शाह यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, आता जनधन योजनेला विरोध करणारे तेच लोक आहेत, ज्यांना त्या ८५ पैशांमध्ये मौजमजा करायची होती. मात्र आता भारत सरकार रुपया देते, तेव्हा तो रुपया थेट गरिबाच्या खात्यात जातो. आता हे म्हणतील, डीबीटी कुणी सुरू केली, जीएसटी कुणी सुरू केली, गरिबी हटाव कुणी म्हटलं? तुम्ही म्हटलं सगळं हो, पण केलं आम्ही.गेल्या कुठलीही कट न लावला २५ लाख कोटी रुपये आम्ही गरिबांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले, असेही अमित शाह यांनी यांनी सांगितले.
यावेळी अमित शाह यांनी कर्जमाफीचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, विरोध नेहमी सांगतात की, ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार. मात्र आमचा कर्जमाफी करण्यावर विश्वास नाही. तर एक अशी व्यवस्था निर्माण करण्यावर आमचा विश्वास आहे, जिथे कुणाला कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. आम्ही शेतकऱ्यांना जे दिलं आहे, ती खैरात नाही आहे, तर आम्ही त्यांना आत्मनिर्भर बनवले आहे, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला.