नवी दिल्लीः भर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांचं हे वागणं चूक की बरोबर, यावर मतमतांतरं आहेत, नेटकरी 'कल्ला' करताहेत. त्यात, राहुल यांच्या मिठीप्रमाणेच त्यांच्या डोळा मारण्याच्या कृतीवरूनही चर्चा रंगलीय. वास्तविक, हे डोळा मारणं बरंच काही सांगून जाणारं आहे. राहुल यांच्या मिठीमागे काँग्रेसची मोठी राजकीय खेळी असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं. 'राहुल गांधी बोलणार आहेत, भूकंपासाठी तयार राहा', अशी खिल्ली भाजपानं उडवली होती. त्यामुळे तर त्यांच्या भाषणाबद्दलची उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. आता, त्यांच्या भाषणामुळे भूकंप आला की नाही, हा वादाचा मुद्दा असला, तरी त्यांनी मोदींशी गळाभेट घेतल्यानं भाजपा नेतृत्वाच्या घशाला कोरड नक्कीच पडली आहे. कारण, राहुल यांची मिठी भले संसदेच्या आचारसंहितेत बसत नसेल, पण त्यांचे आचार-विचार किती स्वच्छ आहेत, हे जनतेला पटवून देण्यासाठी ही 'जादू की झप्पी' नक्कीच काँग्रेसच्या कामी येऊ शकते.
राहुल यांनी सुरुवातीला मोदी सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या. अर्थात, त्यात नवे विषय नव्हते, पण आक्रमकता होती. त्यामुळे भाजपाने गदारोळ केला. हे राहुल यांचं यशच होतं. पण, सेकंड हाफमध्येही ते 'हेडर'ने 'मॅच विनिंग' गोल करतील, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. मात्र, काँग्रेसच्या 'चाणक्यां'नी अचूक 'गेम प्लॅन' आखला होता आणि त्याची चोख अंमलबजावणी राहुल यांनी केली, असं म्हणता येईल.
'तुम्ही मला पप्पू म्हणा किंवा अन्य शिव्या द्या, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नाही, द्वेष नाही. मी काँग्रेस आहे. काँग्रेस ही एक भावना आहे आणि मी तुम्हालाही काँग्रेस करेन', असं म्हणत राहुल यांनी भाषणाचा समारोप केला. त्यानंतर ते थेट मोदींजवळ गेले आणि त्यांना मिठी मारली. हे सगळं भावनेच्या भरात होतंय, असंच सगळ्यांना वाटलं. पण, आपल्या जागेवर बसताना राहुल यांनी शेजारच्या सहकाऱ्यांकडे बघून डोळा मारला. त्यांचे तो आविर्भाव मोहीम फत्ते झाल्याचा होता. आता ही गळाभेट काँग्रेसला फळते की मतदारही त्यांना डोळा मारतात, हे येणारा काळच सांगेल.
लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी मिठी आणि डोळा मारण्यावरून राहुल यांचे कान खेचले आहेत. भाजपाची सोशल मीडिया विंगही कामाला लागली आहे. त्यामुळे ही मिठी मगरमिठीही ठरू शकते, हेही काँग्रेसला विसरून चालणार नाही.
काय म्हणाले राहुल...
सगळ्या विरोधकांना आणि तुमच्यातल्या काही लोकांना घेऊन आम्ही पंतप्रधानांना हरवणार आहोत. माझ्या मनात पंतप्रधाबद्दल राग, द्वेष नाही. उलट, मोदी आणि भाजपाचा मी आभारीच आहे. त्यांनीच मला काँग्रेसचा अर्थ सांगितला. भारतीय असण्याचा अर्थ सांगितला. धर्म शिकवला. शिवाचा अर्थ सांगितला. हिंदू असण्याचा अर्थ सांगितला. यापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. तुमच्यासाठी मी पप्पू आहे. तुम्ही मला कितीही शिव्या देऊ शकता, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल किंचितही राग नाही, द्वेष नाही. मी काँग्रेस आहे. हे सगळे काँग्रेस आहेत. काँग्रेस या भावनेनंच देश बनवला आहे. ही भावना तुमच्याही मनात आहे. मी तुम्हाला काँग्रेस बनवेन.