ऑनलाइन लोकमत
राउलकेला (ओदिशा), दि. १ - लोकशाहीत सत्ताधा-यांनी त्यांच्या कामाचा हिशोब देणे आवश्यक असते. गेल्या १० महिन्यांमध्ये केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जो कोळसा अनेकांसाठी ओझ झाला होता त्याच कोळश्याला आम्ही 'हीरा' बनवले असे मोदींनी नमूद केले.
ओदिशातील राउलकेला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुतनीकरण झालेल्या स्टील प्लॅंटचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या कामकाजाचा हिशोब दिला. मागील सरकारच्या काळात कोळसा घोटाळा झाल्याने देशाचे मोठे नुकसान झाले होते. पण आम्ही सत्तेवर आल्यान अवघ्या २० कोळसा खाणींच्या लिलावातून २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिले असे सांगत नरेंद्र मोदींनी कोळसा खाण लिलाव प्रक्रियेची यशोगाथा मांडली. राउलकेलामधील स्टील प्लँटमध्ये भीषण उष्णतेत काम करणा-या कामगारांमुळेच आज देशात शस्त्रास्त्रांची निर्मिती शक्य होते. या कर्मचा-यांमुळेच आज भारत सुरक्षित आहे असे नमूद करत मोदींनी प्लँटमधील कर्मचा-यांचे कौतुक केले. १० महिन्यांमध्ये भारतावर आलेले निराशाचे ढग दूर करत आशेचा नवा किरण उदयास आला आहे. आता जगभराचे लक्ष भारताकडे लागले आहे असा दावाही केला. भारताच्या पश्चिमेतील राज्यांप्रमाणेच पूर्वेतील ओदिशापासून ते गुवाहाटीपर्यंतच्या भागाचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मोदींनी सांगितले. राज्याचा विकास झाला तर देशाचा विकास होईल या संकल्पनेवर आम्ही चालत असून कोळसा खाणींच्या लिलावातून मिळणा-या पैशांमधील काही वाटा राज्य सरकारला देत आहोत असे मोदींनी स्पष्ट केले