श्रीनगर- नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावरुन जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा जावेद यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही, अशा शब्दांमध्ये इल्तिजा जावेद यांनी नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावरुन सरकारला लक्ष्य करत त्यांची नाराजी व्यक्त केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर मुफ्ती यांना ताब्यात घेण्यात आलं. तेव्हापासून त्यांची मुलगी इल्तिजा त्यांची सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळते.नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आराखड्याला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यानंतर काही तासांमध्ये मेहबूबा मुफ्तींच्या ट्विटरवरुन इल्तिजा यांनी ट्विट केलं. भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाल्यास बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या अल्पसंख्यांकांना भारताचं नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया सोपी होईल. या विधेयकावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. सरकार मुस्लिमांशी भेदभाव करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही; मेहबूबा मुफ्तींच्या कन्येचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 2:17 PM