कोरिया- गरोदर महिलांसाठी केंद्राकडून विविध कल्याणकारी योजना आखल्या जात असल्या तरी अशीही काही ठिकाणं आहेत जेथे गरोदर महिलांना नीट डॉक्टरांकडून उपचारही मिळत नाहीत. अशीच छत्तीसगडमधील कोरियामध्ये घडलेली एक घटना समोर आली आहे. आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने एका गरोदर महिलेने रिक्षेमध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना छत्तीसगडमधील कोरियामध्ये घडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
गरोदर महिलेला कोरियामधील सामुदायिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आणण्यात आलं होतं. पण तेथे महिलेची प्रसुती करण्यासाठी डॉक्टरच उपलब्ध नव्हते. आरोग्य केंद्रात तसंच इतर ठिकाणांहून मदत न मिळाल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी स्वतःचं तिची प्रसुती करण्याचं ठरवलं. व त्या महिलेने रिक्षेमध्ये बाळाला जन्म दिला.
एका संबंधीत माहितीनुसार, भारतात महिला गरोदर असताना किंवा बाळाला जन्म देतानाच्या वेळी झालेल्या गुंतागुतीमुळे एका तासाला पाच महिलांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दरवर्षी बाळाच्या जन्मासंबधित कारणामुळे दरवर्षी 45 हजार महिलांचा मृत्यू होतो.