मुंबई: देशात मंदी असल्याचा विरोधकांचा दावा केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यासाठी त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांचा आधार घेतला. दोन ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानंच चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली असल्याचं प्रसाद म्हणाले. याशिवाय त्यांनी बेरोजगारीवरील एनएसएसओचा अहवालदेखील चुकीचा असल्याचं म्हटलं. केंद्रीय कायदे मंत्री असलेल्या रवीशंकर प्रसाद यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचे आणि बेरोजगारीचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. यावेळी त्यांनी चित्रपटांच्या कमाईचे आकडे सांगितले. 'मला चित्रपट अतिशय आवडतात. चित्रपट चांगला व्यवसाय करत आहेत. २ ऑक्टोबरला ३ चित्रपट प्रदर्शित झाले. सिने उद्योगाच्या एका जाणकारानं दिलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानंच चित्रपट इतकी कमाई करत आहेत,' असं म्हणत प्रसाद यांनी आर्थिक मंदीचा दावा खोडून काढला.
एका दिवसात ३ चित्रपट कमावताहेत १२० कोटी; मग कुठंय मंदी?; केंद्रीय मंत्र्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 7:02 PM