ऑनलाइन लोकमत
जालंधर, दि. २५ - कार्यालयातील महिला कर्मचा-यांनी बलात्कार किंवा लैंगिक शोषणाची खोटी तक्रार करु नये यासाठी जालंधरमधील एका वैद्यकिय अधिका-याने महिला कर्मचा-यांना कॅबिनमध्ये प्रवेश बंदी केली आहे. कामासाठी भेट घेणे आवश्यक असल्यास सोबत दोन महिला किंवा पुरुष कर्मचारी असतील तरच कॅबिनमध्ये प्रवेश करावा असा फतवा जालंधरमधील वैद्यकीय अधिका-याने काढला आहे.
जालंधरमधील कामगार रुग्णालयात नियुक्तीवर असलेल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिका-याने काही दिवसांपूर्वी एक परिपत्रक काढले होते. या परिपत्रकात कामगार रुग्णालयातील महिला कर्मचा-यांनी एकट्या असताना कॅबिनमध्ये प्रवेश करु नये असा उल्लेख करण्यात आला होता. या वादग्रस्त फतव्याने महिला कर्मचा-यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. महत्त्वाचे काम असल्यास अधिका-याची भेट घ्यायची असा सवालही महिलांनी उपस्थित केला. महिलांना कॅबिनमध्ये प्रवेश बंदीचा फतवा म्हणजे लिंगभेदाचा प्रकार असल्याचा आरोप महिला कर्मचा-यांनी केला. अखेरीस आरोग्य मंत्रालयाने संबंधीत अधिका-याला परिपत्रक मागे घेण्याचे आदेश देत वादावर पडदा टाकला. याविषयी माहिती देताना आरोग्य विभागाचे संचालक डॉ. भागमल सिंग म्हणाले, आम्ही या प्रकरणाचा अहवाल आरोग्य मंत्र्यांना पाठवला आहे. संबंधीत अधिका-यावरील कारवाईचा निर्णय आरोग्यमंत्रीच घेतली. विभागात काम करणा-या सर्व कर्मचा-यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आम्ही कटीब्ध असून कामाच्या ठिकाणी लिंगभेद खपवून घेणार नाही असेही त्यांनी सांगितले.