नंदकिशोर पुरोहित -
राजकोट : गुजरातविधानसभा निवडणुकीमध्ये एका गावात नेत्यांना प्रवेशबंदी आहे, हे ऐकून आश्चर्यच वाटेल. या गावात मतदान न केल्यास नागरिकांना दंडही भरावा लागतो. मागील २० वर्षांपासून ही व्यवस्था इथे आहे. याबाबत कोणत्याही नागरिकाची तक्रार नाही, असे हे अनोखे गाव राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जन्मभूमी सौराष्ट्रच्या राजकोट जिल्ह्यातील राजसमदियाला आहे.
गावात १९४८ पासून सरपंचाची निवड बिनविरोध होते. सरपंच होण्यासाठी एकच अट आहे-तन, मन व धनाने नागरिकांची सेवा करावी लागते. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी येथे येऊन त्यांच्या पक्षाचा प्रचार केल्यास गावातील एकता प्रभावित होईल, असे गावातील लोकांना वाटते. त्यामुळे कोणता उमेदवार, कोणत्या पक्षाला मतदान करायचे आहे, हे गावातील एक समिती निश्चित करते. सरपंच हरदेवसिंह जडेजा यांचे लहान बंधू हरितसिंह जडेजा यांनी सांगितले की, वाद मिटवायचा असो की सणवार साजरा करायचा असो.
सर्व कामे संमतीने होतात. वाद मिटवण्यासाठी सर्व प्रमुख समाजाच्या एक व्यक्तीला निवडून लोक अदालतचे गठन होते. याचा फैसला सर्वमान्य असतो.
थकबाकीसाठी कुणाला नोटीस नाही - - पंचायत कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारे पार्थ भट यांनी सांगितले की, गावात सरकारी कराची वसुली शंभर टक्के होते. आजपर्यंत कोणालाही थकबाकी भरण्यासाठी नोटीस जारी करण्याची वेळ आलेली नाही. - प्रत्येक कुटुंबाला सदस्यांच्या संख्येच्या प्रमाणात झाडे लावणे अनिवार्य आहे. राजसमदियाला गावात आजवर पोलिस बोलावण्याची कधी वेळ आली नाही. येथे पोलिस कधी आलेच तर समन्स देण्यासाठी.
प्रदूषणरहित औद्योगिक पार्क -राजसमदियाला गावात अलीकडेच १४० एकर जागेवर औद्योगिक पार्क विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जे उद्योग प्रदूषण करीत नाहीत, अशाच उद्योगांना येथे जागा दिली जाणार आहे. लोखंडी स्पेअर पार्टस्, कापसाचा धागा तयार करण्यासारख्या उद्योगांना येथे जागा दिली जाईल. अनेक उद्योगांनी येथे येण्यात रस दाखवला आहे.