ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - मराठीच्या अस्मितेचा मुद्दा लावून धरणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवरात्र उत्सवातही याच मुद्यावर ठाम असून मनसेच्या गरब्यात गुजराती गाण्यांना प्रवेश नसून केवळ मराठी लोकसंगीत लावण्यात येणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी ते दहीसरदरम्यान १२ विधानसभा मतदारसंघात मनसेने पाठिंबा दिलेला गरब्यात केवळ मराठी लोकसंगीत, तसेच पारंपारित गाणी वाजवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या भागातच गुजराती नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.
गुजराती लोकांच्या संस्कृतीतील अविभाज्य भाग असलेला 'गरबा' त्यांच्यासोबतच मुंबईत आला. पण महाराष्ट्रातही नवरात्रीदरम्यान देवीची पूजा करण्यात येते आणि भोंडल्याचा खेळ खेळला जातो, असे ठाकरे यांनी सांगितले. मनसेने कांदिवलीसह अनेक ठिकाणी भोंडला उत्सवाची पोस्टर्स लावली असून मनसेच्या या भूमिकेमुळे नवरात्र उत्सवात मराठी. वि. गुजराती असा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दांडिया आणि गरब्यासाठीची मूळ गाणी गुजराती भाषेत आहेत. जरी त्यावर कोणत्याही राज्यातील किंवा भाषेतील गाण्यांच्या तालावर नृत्य करता येऊ शकत असले तरीही भाषेतील बदलामुळे त्यातील मजा हरवू शकते, अशी प्रतिक्रिया एका गुजराती महिलेने दिली आहे. तर सांस्कृतीक बाबींमध्ये राजकारण आणण्यापेक्षा मनसेने जाहीर केलेल्या ब्ल्यू-प्रिंटवर लक्ष देऊन काम करावे, असे मत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या अरूणा पेंडसे यांनी व्यक्त केले.