बंगळुरू : कोरोनाबाधितांचा राज्यातील आकडा वेगाने वाढू लागल्याने खबरदारी म्हणून कर्नाटकने मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या महाराष्ट्र, तामीळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांतून रस्ते तसेच रेल्वे मागार्ने येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी घातली आहे, तर विमानाने येणाऱ्यांवर बंदी नाही.
इतर राज्ये तसेच परदेशातून मोठ्या संख्येने लोक परतू लागल्याने कर्नाटकच्या कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याचे लक्षात आल्यानंतर कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यात येणा-यांच्या विलगीकरणाची सोय करणे, त्यांच्या दोन वेळा कोरोना चाचण्या करणे आदी सोयी तातडीने करणे आम्हाला शक्य नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
१८ मे रोजी चौथ्या लॉकडाउनच्या घोषणेनंतर कर्नाटकने महाराष्ट्र, गुजरात, तामीळनाडू आणि केरळमधील लोकांना येण्यास बंदी घातली होती. परंतु विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर ही बंदी उठवली. परंतु लोकांची वाहतूक करण्याबाबत राज्यांनी परस्पर संमतीनेच निर्णय घ्यावा, असे केंद्राने स्पष्ट केल्यानंतर कर्नाटकने पाच राज्यांतून येणा-यांवर बंदी घातली आहे.
2418 कोरोनाबाधित सध्या कर्नाटकात आहेत. गेल्या २४ तासांत हा आकडा १३५ ने वाढला. यातील ११८ परराज्यातून आलेले आहेत. राज्याचे कायदामंत्री जे. सी. मधु स्वामी याबाबत म्हणाले की, पुढचे १० ते १५ दिवस या राज्यांतून एकही कोरोनाचा रूग्ण कर्नाटकमध्ये येऊ नये याची आम्ही खबरदारी घेणार आहोत.