पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओसाठी खर्च किती?, PMOनं दिली ही माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 09:21 AM2018-08-22T09:21:33+5:302018-08-22T09:38:39+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस व्हिडीओवर किती रुपयांचा खर्च करण्यात आला?, याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस व्हिडीओवर किती रुपयांचा खर्च करण्यात आला?, याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आली आहे. या व्हिडीओवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र व्हिडीओ बनवण्यासाठी एक रुपयाचाही खर्च करण्यात आलेला नाही, असे उत्तर पंतप्रधान कार्यालयानं देऊन आरोप फेटाळून लावला आहे. माहिती अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पीएमओनं ही माहिती दिली आहे.
योग दिनाच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजेच 13 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर आपला फिटनेस व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणायाम, योगासने करताना दिसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या 'हम फिट तो इंडिया फिट' अभियानात सहभाग नोंदवत आपला एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. या मोहीमेत सहभागी होण्यासाठी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करत पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज दिलं होतं. मोदींनी विराटचं चॅलेंज स्वीकारत ते पूर्णही केलं.
दरम्यान, मोदींचा फिटनेस व्हिडीओ बनवण्यासाठी तब्बल 35 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केला होता. तर दुसरीकडे, काँग्रेस खासदारांनी असेही ट्विट केले होते की, ''योग दिनानिमित्त केंद्र सरकारकडून जाहिरातींवर 20 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला तर पंतप्रधानांच्या फिटनेस व्हिडीओवर 35 लाख रुपये खर्च झाला''. मात्र काँग्रेसचा आरोप केंद्र सरकारनं फेटाळून लावला.
पंतप्रधान कार्यालयानं माहिती अधिकार कायद्या अंतगर्त दाखल करण्यात आलेल्या एका अर्जाला उत्तर देताना केंद्र सरकारनं स्पष्ट केले की, 'नरेंद्र मोदी यांचा फिटनेस व्हिडीओ बनवण्यासाठी कोणताही खर्च करण्यात आलेला नाही. हा व्हिडीओ पंतप्रधानांच्या निवासस्थानातच बनवण्यात आला होता. शिवाय याचं चित्रिकरण पीएमओच्या कॅमेरामननं केले होते. चित्रिकरणासाठी अन्य कोणतेही साहित्य खरेदी करावे लागले नाही'.
(पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओची 'नेटिझन्स'कडून खिल्ली)
Here are moments from my morning exercises. Apart from Yoga, I walk on a track inspired by the Panchtatvas or 5 elements of nature - Prithvi, Jal, Agni, Vayu, Aakash. This is extremely refreshing and rejuvenating. I also practice
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2018
breathing exercises. #HumFitTohIndiaFitpic.twitter.com/km3345GuV2
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींनी वॉकिंग ट्रॅकबाबतची विशेष माहितीही शेअर केली होती. नवी दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. या व्हिडीओमधील वॉकिंग ट्रॅकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन हा वॉकिंग ट्रॅक बनवण्यात आल्याची माहिती मोदींनी दिली होती.
या ट्रॅकबद्दल माहिती देताना मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते की, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या ट्रॅकवरून मी दररोज सकाळी चालतो. त्यामुळे खूपच ताजेतवाने आणि उत्साही वाटते. एका झाडाभोवती वर्तुळाकार कक्षेत हा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकचे वेगवेगळे भाग करण्यात आले असून त्यामध्ये हिरवळ, माती, दगडगोटे, पाणी आणि रेती ठेवण्यात आली आहे.