नवी दिल्ली - दिवाळी म्हणजे भारतीयांचं सर्वात मोठा उत्सव. गरिबातील गरिबांपासून ते गर्भश्रीमंतांच्याही घरात दिवाळी साजरी केली जाते. गोड-धोड पदार्थांचा फराळ, नवे कपडे आणि फटाक्यांची आतषबाजी म्हणजे दिवाळी. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी केली जाते. त्यानुसार, आता दिल्लीतील केजरीवाल सरकारने यंदाच्या दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे दिल्लीकरांची दिवाळी फटाकेमुक्त आणि धूरमुक्त असणार आहे.
दिवाळीत फटाके आणि दरवर्षी दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्याचा अतिरेक करून कोट्यवधी रुपयांचा धूर करण्याची दिल्लीकरांची सवय आहे. मात्र, प्रदुषणमुक्त दिल्लीसाठी केजरीवाल सरकारने दिल्लीत फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी यासंदर्भातील घोषणा केली. हिवाळ्यात फटाक्यांची विक्री आणि फटाके वाजवण्यास बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, असे राय यांनी सांगितले. फटाक्यांसदर्भातील परवाने न देण्याच्या सूचना दिल्ली पोलिसांनी सरकारच्यावतीने करण्यात आल्या आहेत. हिवाळ्याच्या हंगामात दिल्लीत प्रदुषणाचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे, संपूर्ण हिवाळ्यातील प्रदुषण रोखण्यासाठी सरकारकडून यंत्रणा उभी केली जात आहे, असेही राय यांनी सांगितले.
दिल्ली सरकारच्या या निर्णयावर आता दिल्लीकरांची भूमिका काय राहिल हे पाहावे लागणार आहे. याशिवाय दिवाळीत फटाके फोडण्या सरकार काही प्रमाणात शिथीलता देईल का, हेही पाहावे लागेल.
दरम्यान, गतवर्षी फटाक्यांवर पूर्ण बंदी लागू करण्यासाठी सरकारच्या वतीने ४०८ पथके तयार करण्यात आली होती. त्यात महसूल विभागाची १६५ पथके, त्यांच्या जोडीला दिल्ली पोलिसांची २१० व दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाची ३३ पथकांचा समावेश होता. मात्र, या पथकांची फिरती सुरू राहते आणि फटाक्यांचा धूरही सुरू राहतो हा नेमेची येणारा अनुभव आहे. त्यामुळे, यावर्षीही दिल्लीतील फटाकेबंदीचा निर्णय कागदोपत्रीच राहतो की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.