नवी दिल्ली: पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये POK पिनपॉईंट स्ट्राईक PinPoint Strike केल्याच्या वृत्तावर भारतीय सैन्यानं स्पष्टीकरण दिलं आहे. नियंत्रण रेषेवर कोणताही गोळीबार झाला नसल्याचं भारतीय सैन्यानं म्हटलं आहे. 'एएनआय'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू असल्यानं प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानं स्ट्राईक केल्याची चर्चा होती. त्यावर भारतीय सैन्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवर सातत्यानं गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानी सैन्यानं बेछूट गोळीबार करत सीमावर्ती भागात असलेल्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्याच आठवड्यात पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारताचे ५ जवान शहीद झाले. यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानचे बंकर उद्ध्वस्त केले. यामध्ये पाकिस्तानचे ११ सैनिक मारले गेले.पाकिस्तानकडून दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न सुरूहिवाळ्याच्या दिवसांमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय हद्दीत दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न होतात. गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करता यावी यासाठी सीमावर्ती भागांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. जम्मू काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू असल्याचं समजतं. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य काश्मीरमधील अनेक सेक्टर्समध्ये गोळीबार करत आहे. त्यांच्याकडून अनेकदा सामन्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच दुसऱ्या बाजूनं पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना 'कव्हर फायर' देत आहे.