ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. २८ - 'अच्छे दिन' येणार या आशेवर जगणा-या सर्वसामान्यांच्या आशेवर केंद्रीय बजेटच्या दिवशी सरकारने पाणी फिरवले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर असतानाही देशात तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढवल्या. पेट्रोलचे दर प्रति लीटर ३ रुपये १८ पैसे तर डिझलचे दर प्रति लीटर ३ रुपये ९ पैशांनी वाढविण्यात आले आहेत. आज रात्री १२ वाजल्यापासून ही नवी दर वाढ लागू करण्यात येणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेल्या काही महिन्यांत उतरल्याने जनतेला थोडा दिलासा मिळाला होता. मात्र आता जनतेला पुन्हा एकदा महागाईला सामोरे जावे लागणार अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरशे प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ केली नाही परंतू मालवाहतूक दर ८ ते १० दक्के वाढविले आहे. मालवाहतूक दर वाढवून काही तासांचा अवधी लोटत नाही तोच आता पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परीणाम मालवाहतूक भाडेवाढीवर होणार असून त्याची झळ सर्वसामान्य नागरीकांना बसणार आहे.
अच्छे दिन नाहीच...पेट्रोल, डिझेल महागले !
By admin | Published: February 28, 2015 8:24 PM