नवी दिल्ली: या जगात नोटाबंदीसारखी दुसरा खोटारडेपणा असू शकत नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. ते रविवारी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या महाविधेशनातील दिशादर्शक चर्चासत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारला आर्थिक धोरणांवरून लक्ष्य केले.रिझर्व्ह बँकेला अजूनही नोटाबंदीनंतर परत आलेल्या जुन्या नोटांची मोजदाद पूर्ण करता आलेली नाही. तुम्ही हे काम तिरूपती मंदिरातील हुंडीतील पैशांची मोजदाद करणाऱ्यांकडे द्या. ते तुमच्यापेक्षा कमी वेळात हे काम पूर्ण करतील, असा टोला यावेळी चिदंबरम यांनी लगावला. सध्याच्या आर्थिक प्रगतीची बीजे ही 1990 मध्ये राजीव गांधी यांनी रोवली होती. त्यांनी जागतिकीकरणासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची दारं खुली केली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ही प्रक्रिया आणखी गतिमान झाली. सध्या भाजपाकडून अनेक दावे केले जात असले तरी या नोंदी खरी परिस्थिती स्पष्ट करतात, असे चिदंबरम यांनी सांगितले. फक्त काँग्रेस पक्षच देशाला या आर्थिक संकटातून बाहेर काढू शकतो. माझ्या या बोलण्यामागे कोणत्याही प्रकारचा उद्दामपणा नाही. परंतु, आम्ही या आधीही असे केले आहे आणि आता पुन्हा तशी कामगिरी आम्ही करू शकतो. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशातील 14 कोटी लोक दारिद्य्ररेषेच्या वर आले, हे यूपीए सरकारचे मोठे यश आहे. मात्र, भाजपाच्या काळात लोकांची गरिबी वाढली. दारिद्य्ररेषेखालील लोकसंख्येत मोठी वाढ झाली. हे भाजपाचे सर्वात मोठे पाप आहे, अशी टीका चिदंबरम यांनी केली.
नोटाबंदीसारखा दुसरा खोटारडेपणा असू शकत नाही- पी. चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 4:03 PM