नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगात कोरोनावरील लस तयार करण्यासाठी जोरात काम सुरू आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 पर्यंत लोकांना कोरोनाची लस मिळेल, अशी सर्वांना आशा आहे. याचबरोबर, कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकारने सुद्धा आपली तयारी व नियोजन मजबूत केले आहे.
यातच कोरोना लसीवरून योगगुरू बाबा रामदेव यांचे मोठे विधान समोर आले आहे. तसेच, आपल्या जीवनशैलीत योगाचा समावेश करण्याचा सल्लाही बाबा रामदेव यांनी लोकांना दिला आहे. बाबा रामदेव म्हणाले, "135 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात 2021 मध्ये सामान्य लोकांना लस मिळेल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत योग, आयुर्वेद आणि जीवनशैलीतील बदलांपासून लोकांचे प्राण वाचतील."
दुसरीकडे, केंद्र सरकारने संपूर्ण देशात लसीकरण मोहीम राबवण्याचे आश्वासन कधी दिलेच नव्हते, असे वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. लसीची कार्यक्षमता आणि कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडणे या दोन घटकांवर लसीकरण मोहिमेची वाटचाल अवलंबून असेल. जर आपण गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांपर्यंत योग्य वेळेत लस पोहोचवली तर कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडता येईल. जेणेकरून आपल्याला देशातील संपूर्ण लोकसंख्येसाठी लसीकरण मोहीम राबवण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येत्या 4 तारखेला सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. संसदेतील सर्व पक्षांच्या मुख्य नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. देशात लॉकडाऊन झाल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात सर्वपक्षीय बैठक झाली होती.