नवी दिल्ली - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला दिवसेंदिवस आक्रमता येत असून पाठिंबाही वाढत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांची भेट घेतली आणि शेतकरी आंदोलनाला शिवसेनाचा पाठिंबा दर्शवला. तर, पॉपस्टार गायिका आणि अभिनेत्री रिहाना हिनेही शेतकरी आंदोलनासंदर्भात आपण बोलत का नाही? असे म्हणत आंदोलक शेतकऱ्यांचे समर्थन केलंय. गेल्या 68 दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून अधिक आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत देणार नसल्याचे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं.
लोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. तसेच, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारकडून कुठलिही आर्थिक मदत देण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण तोमर यांनी केलं. कोरोनामुळे शेतकरी आंदोलनातील महिला व लहान मुलांना घरी पाठविण्यात यावं, असं आवाहन अनेकवेळा करण्यात आलं होतं, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे आत्तापर्यंत शेतकरी आंदोलक आणि सरकारमध्ये चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या असून अद्यापही मार्ग निघाला नाही. दरम्यान, लोकसभेत चर्चेदरम्यान विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कृषीमंत्र्यांनी शांत राहण्याचं आवाहन केलं. तसेच, सरकार संसद सभागृहात आणि सभागृहाबाहेरही चर्चेला तयार असल्याचं तोमर यांनी म्हटलंय.
भारतीय किसान युनियनने दावा केला आहे की, आत्तापर्यंत गेल्या 68 दिवसांत 70 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा या आंदोलनात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये, थंडी आणि ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. थंडीमुळेच महाराष्ट्राच्या गडचिरोली येथील सिताबाई यांचाही याच आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, सरकारने आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी दिली नाही, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासही स्पष्टपणे नकार दिलाय.