नवी दिल्ली : केद्रीय गृहमंत्री अमित शाह अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना अमित शाह यांनी कलम 371 बाबत मोठे विधान केले. कलम 370 हटविल्यानंतर कलम 371 सुद्धा हटविले जाईल, असा संभ्रम पसरविला जात आहे. मात्र, तसे कधीच होणार नाही, असे अमित शाह यांनी यावेळी म्हटले.
आजच्या दिवशीच 33 वर्षापूर्वी अरूणाचल राज्याची स्थापना झाली होती. मला आनंद आहे की, गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि येथील पेमा खांडू यांच्या नेतृत्वात विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. पूर्वोत्तर भारतासाठी नेहमीच जास्त महत्वाचा राहिला आहे, या दुर्गम भागात स्थायिक झालेले आदिवासी भारतीय संस्कृतीसाठी एका श्रृंगारापेक्षा कमी नाहीत, असे अमित शाह यांनी सांगितले.
याचबरोबर, भारताची संस्कृती ही पूर्वोत्तरच्या संस्कृतीशिवाय अपूर्णच नाही तर अपंगही आहे. ऑगस्टमध्ये जेव्हा कलम 370 हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी अफवा आणि गैरसमज सुद्धा याठिकाणी पसरविण्यात आल्या की कलम 371 सुद्धा हटविले जाईल. मात्र, येथील संपूर्ण पूर्वोतर भागातील लोकांना सांगू इच्छितो की, कोणीही कलम 371 काढू शकत नाही किंवा ते काढण्याचा कोणताही हेतू नाही, असे अमित शाह म्हणाले.
पूर्वोत्तर क्षेत्र 2014 पूर्वी फक्त भारताच्या काही भागांशी भौगोलिकदृष्ट्या जोडलेला होता. मात्र, खरंतर मोदी सरकारच्या काळात सर्वत्र जोडला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. याशिवाय, पूर्वोत्तर भागात बंडखोर, सीमेवरील आंतरराज्यीय संघर्ष यांसारख्या समस्यांपासून मुक्त व्हावा, असे मोदी सरकारला वाटते. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीपूर्वी पूर्वोत्तर बंडखोर, सीमेवरील आंतरराज्यीय संघर्ष यांसारख्या समस्यांपासून मुक्त होईल, असेही अमित शाह यांनी यावेळी म्हटले.