कलबुर्गी (गुलबर्गा) : स्वत:ला चौकीदार म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान मोदी यांची स्वत:ची चोरी पकडली जाताच, आता ते सारे भारतीयच चौकीदार असल्याचे सांगू लागले आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी कर्नाटकातील जाहीर सभेत केली. मोदी यांनी स्वत:ला किती चौकीदार म्हणवून घेतले, तरी ते चोर असल्याचे प्रत्येक भारतीयाने ओळखले आहे, असेही ते म्हणाले. कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या कलबुर्गी मतदारसंघातील प्रचारसभेद्वारे केली.राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान होताच मोदी यांनी स्वत:ला ‘चौकीदार’ म्हणवून घेत प्रत्यक्षात मात्र काही ठरावीक श्रीमंतांची चौकीदारी करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदी केवळ चोरच नाहीत, तर ते खोटेही बोलतात. दरवर्षी तरुणांसाठी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अशी अनेक आश्वासने त्यांनी दिली, पण तीही खोटी ठरल्याचे भारतीय जनतेने ओळखले आहे.देशात विद्वेष व परस्परांत अविश्वास निर्माण करण्याचे काम भाजपातर्फे सुरू आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. (वृत्तसंस्था)काँग्रेस विरोध करणारनोटाबंदीद्वारे मोदी यांनी प्रत्येक भारतीयाला त्रास दिला. त्यांनी तेव्हा अनेक नोटा रद्द केल्या आणि आता तर मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे मिळून भारताची राज्यघटनाच रद्द करण्याच्या तयारीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. राहुल म्हणाले की, ही कटकारस्थाने भारतीय जनता सहन करणार नाही आणि काँग्रेसही असे प्रकार यशस्वी होऊ देणार नाही.
चौकीदार नाही चोरच, हे जनतेने ओळखले आहे, राहुल गांधी यांची मोदी यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 6:03 AM