...म्हणून पोलिसांना सुट्ट्या मिळणार नाहीत, सरकारी फर्मान जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 08:27 PM2019-11-02T20:27:53+5:302019-11-02T20:28:19+5:30
पोलीस मुख्यालयाद्वारे आदेश जारी
भोपाळ : अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. उत्तर प्रदेश पाठोपाठ आता मध्य प्रदेश सरकारनेही पोलिसांना निर्देश दिले आहेत. यामध्ये अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी सुट्ट्यांसाठी अर्ज करू नका, असे सांगण्यात आले आहेत. यासंबंधी शुक्रवारी राज्य पोलीस मुख्यालयाद्वारे आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशाद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मिलाद-उन-नबी, गुरुनानक जयंती आणि अयोध्या प्रकरणाचा निकाल या पार्श्वभूमीवर धार्मिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात यावा. तसेच, पुढील आदेश येईपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबरपासून सुट्टी घेण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, आप्तकालीन परिस्थितीत सुट्टी घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल 17 नोव्हेंबरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर 6 ऑगस्टपासून 40 दिवस दररोज सुनावणी सुरू होती. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई 18 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्याआधी या प्रकरणाचा निकाल येऊ शकतो.
निकालाआधीच अयोध्येत कलम 144 लागू
जिल्हाधिकारी अनुज झा यांनी अयोध्येत कलम 144 लागू केली आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेतेसाठी 200 शाळा आरक्षित करण्यात आल्या आहेत. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी कलम 144 लागू करण्यात आली आहे.