केवाडिया : नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही आणि केंद्रात भाजपा सरकार असल्यामुळे दहशतवादी घाबरले असल्याचे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले. गुजरात येथे भाजपा नेत्यांना संबोधित करताना ते बोलत होते. नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे पार पडलेल्या बैठकीत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. देशातील जवानांप्रती काँग्रेस संवेदनशील नसल्याचाही आरोप करताना त्यांनी ४० वर्ष One Rank-One Pension (OROP) हा प्रश्न सोडवला नाही, असेही ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की,''आम्ही दहशतवाद्यांना यशस्वी होऊ दिलेलं नाही. जम्मू-काश्मीर सोडाच, मोदीजी यांचे सरकार आल्यानंतर देशात कुठेही एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. हे खूप मोठं यश आहे. दहशतवादी भाजपा सरकारला घाबरत आहेत. ही छोटी गोष्ट नाही. दहशतवाद्यांना हे कळून चुकलंय की त्यांची आता गय केली जाणार नाही. उरी हल्ल्यानंतर आम्ही सर्जिकल स्ट्राईक करून जगाला हे ठणकावून सांगितलंय की दहशतवाद्यांची खैर नाही.''
मागील ४० वर्षांपासून भारतीय जवान One Rank-One Pension (OROP) मागणी करत आहेत, परंतु काँग्रेस संवेदनशील नाहीत आणि तो मुद्दा त्यांनी सोडवला नाही, परंतु मोदीजींनी लगेच त्याची अंमलबजावणी केली. भाजपा व काँग्रेस सरकार यांच्यातील फरक यातूनच स्पष्ट होतो, असेही सिंह यांनी सांगितले. काँग्रेस फक्त महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर करतात, परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत नाहीत, असाही आरोप सिंह यांनी केला.
अयोध्येतील राम मंदिर ही फक्त आमची घोषणाबाजी नव्हती, तर ती आमची बांधिलकी होती, असेही सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले,''आम्ही नेहमीच दिलेली वचनं पूर्ण केली आहेत. तो केवळ आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नव्हता, तर ती आमची सांस्कृतिक बांधिलकी आहे. आता राम मंदिर बांधण्यापासून कुणीच अडवू शकत नाही.''