Amit Shah Pm Narendra Modi vs Opposition Alliance: देशातील मोदी सरकारविरोधात विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. विरोधकांनी भाजपेतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच विरोधकांच्या पक्षांनी मिळून INDIA ही आघाडी उभारली आहे. या आघाडीत अनेक छोटे मोठे पक्ष सहभाग नोंदवत आहेत. भाजपाप्रणित NDA च्या विरोधात सर्व बडे नेतेमंडळी एकत्र आले असून त्यांची आघाडी मोदींची सत्ता उलथवून टाकेल असा विश्वास INDIA ने वेळोवेळी व्यक्त केला आहे. याच मुद्द्यावर आज देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर सडकून टीका केली. विरोधी पक्षाच्या लोकांना जितक्या आघाडी करायच्या असतील, तेवढ्या त्यांनी कराव्या, पण कितीही, काहीही केलं तरी जिंकणार नरेंद्र मोदीच, तेच पूर्ण बहुमताने पुन्हा पंतप्रधान होणार, असा दावा त्यांनी केला.
"माझं सगळ्या पक्षांना आवाहन आहे की, एखादी निवडणूक जिंकण्यासाठी किंवा केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी एखाद्या विधेयकाचे समर्थन किंवा विरोध करण्याचे राजकारण करू नका. नवीन गठबंधन बनवण्याचे अनेक प्रकार असतात. त्यामुळे कोणत्याही विधेयकाचे स्वागत किंवा विरोध करताना देशाचा आणि दिल्लीचा विचार केला पाहिजे. दिल्लीच्या मंत्र्यांनी कितीही भ्रष्टाचार केला तरी विरोधक बनून त्यांचेच समर्थन करायचे कारण तुम्हाला त्यांच्यासोबत आघाडी करायची आहे, ही पद्धत योग्य नाही. त्यामुळे तुम्ही दिल्लीचा विचार करा, आघाडीचा विचार करू नका; कारण तुम्ही कितीही आघाडी केलीत तर त्यानंतरही पूर्ण बहुमताने नरेंद्र मोदीचपंतप्रधान होणार," असे अमित शाह यांनी विश्वासाने म्हटले.
"विरोधकांनी देशाचे हित बघावे, जनतेच्या हिताचा विचार करा. आघाडी करून तुम्ही जनतेचा विश्वास जिंकू शकाल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसे होणार नाही. कारण तुमच्या विश्वास ठेवून तुम्हाला जनतेने १० वर्ष सत्ता दिली होती. पण UPAच्या काळात १२ हजार कोटींचे घोटाळे बाहेर आले. आतादेखील जर आघाडी करायची म्हणून इतर विरोधक दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचाराकडे कानाडोळा करत असाल तर देशातील जनता या गोष्टी पाहत आहे. निवडणुकीत या गोष्टींचा हिशेब जनतेकडून केला जाईल. त्यामुळे मला काँग्रेसच्या लोकांना सांगायचं आहे की दिल्लीतील लोकांचे विधेयकाचं काम झालं की ते तुमच्या आघाडीत येणार नाहीत, त्यामुळे तुम्ही फक्त जनतेचा विचार करा," असा खोचक सल्लाही अमित शहांनी दिला.