बेंगळुरू : अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी (Ram Mandir) जमा होत असलेल्या देणगीवरून राजकारण अधिकच तापताना दिसत आहे. कर्नाटकमध्ये गेले काही दिवस राम मंदिराच्या देणगीवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर केलेल्या आरोपांनंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामैय्या (Siddaramaiah) यांनी राम मंदिरासाठी देणगी देणार नसल्याचे सांगितले आहे. (congress leader siddaramaiah says will not give contributed money for disputed ram mandir)
राम मंदिरासाठी देणगी मागायला आले, तर त्यांना सांगेन की, अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिरासाठी काही झाले तरी देणगी देणार नाही. त्यामुळे दुसरीकडे बांधल्या जात असलेल्या राम मंदिरासाठी देणगी देईन, असे सिद्धारामैय्या यांनी स्पष्ट केले. अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिर प्रकरणी तोडगा निघाला असला, तरी वाद कायम राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सिद्धारामैय्या यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या बैठकीत कर्नाटक आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक मुद्यांवर चर्चा झाली, अशी माहिती सिद्धारामैय्या यांनी दिली.
नाझींनी जर्मनीत केले, तेच RSS करतेय; राम मंदिर देणगीवरून कुमारस्वामींची टीका
विश्व हिंदू परिषद नाराज
माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केलेल्या राम मंदिरासाठी जमा केल्या जात असलेल्या देणगीबाबत केलेल्या ट्विटवरून विश्व हिंदू परिषदेने नाराजी व्यक्त केली आहे. कुमारस्वामी यांनी बेजबाबदारपणे ट्विट केले आहे. श्रीराम ही भारताची ओळख आहे, हे सर्वश्रुत आहे. विश्व हिंदू परिषद आणि संलग्न संघटना राम मंदिरासाठी देणग्या गोळा करत आहे. बहुतांश जण आपापल्यापरिने योगदान देत आहेत. अशावेळी कुमारस्वामी यांनी केलेले ट्विट योग्य नाही, असे विश्व हिंदू परिषदेकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
काय म्हणाले होते कुमारस्वामी?
'राम मंदिर निधी समर्पण अभियान'चे कार्यकर्ते कर्नाटकात देणग्या गोळा करण्याचे काम करत आहे. मात्र, जे स्थानिक पैसे देत नाहीत, त्यांची नावे लिहून घेत आहेत. ते असे का करत आहे, याची मला कल्पना नाही. मात्र, नाझींनी जे जर्मनीमध्ये केले, तेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला होता.