नवी दिल्ली -काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या पदाची सूत्रे आज हाती घेतली. यावेळी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह पक्षातील सर्व बड्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. दोन दशकानंतर काँग्रेसला गैर गांधी अध्यक्ष मिळाला आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गेंकडे अध्यक्षपदाचा पदभार सोपवल्यानंतर काही तासांतच प्रियांका गांधी वाड्रा यांनी आई सोनियासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
सोनिया गांधी सर्वाधिक काळ पक्षाच्या अध्यक्षा होत्या. 24 वर्षानंतर आता मल्लिकार्जुन खर्गे पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत. आज पदभार स्विकारल्यानंतर खर्गे यांनी सोनिया गांधींना राजीव गांधींचा फोटो भेट दिला. फोटो हातात घेतल्यानंतर सोनिया गांधी यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. दरम्यान, प्रियांका गांधींनी सोनिया गांधी हातात राजीव गांधी यांचा फोटो घेतलेला फोटो शेअर केला आहे.
सोनिया गांधी 1998-2017 पर्यंत आणि नंतर 2019-22 पर्यंत पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा होत्या. त्यांनी 1968 मध्ये राजीव गांधींशी लग्न केले होते. राजीव गांधींची 21 मे 1991 मध्ये श्रीपेरंबदूरमध्ये हत्या झाली. सोनिया गांधी सुरुवातीला राजकारणापासून लांब होत्या. पण, पतीच्या मृत्यूनंतर 1997मध्ये त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.