नवी दिल्ली :भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघाला नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. भारत-चीन सीमावादासंदर्भात आज (बुधवारी) संरक्षणमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते.
लडाख येथील भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती जैसे थे आहे. सीमावादासंदर्भात दोन्ही देश अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत. असे असले तरी सैन्यस्तरीय चर्चा सुरू असून, लवकरच आणखी एक बैठक होणार आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
भारत-चीन सीमाप्रश्न प्रदीर्घ काळापासून वादात आहे. यावर तोडगा निघायला हवा. चीनसोबत चर्चा सुरू आहे. आतापर्यंत पार पडलेल्या चर्चांमधून काहीच तोडगा निघालेला नाही. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती आहे, तशी कायम आहे, असेही त्यांनी सांगितले. कोणताही देश विस्तारवादी धोरणाचा अवलंब करत असेल, तर भारतात घुसखोरी करण्यापासून त्या देशाला थांबवण्याचे सामर्थ्य आणि क्षमता आपल्याकडे आहे, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
भारत-चीन सीमाप्रश्न निकाली निघाला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. चीन सीमा भागात त्यांच्याबाजूने नियमितपणे पायाभूत सुविधा तयार करत आहे. मात्र, भारत सैन्य आणि नागरिकांसाठी काम करत आहे. कोणावरही आक्रमण करण्यासाठी नाही, तर देशवासीयांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारताकडून अनेक कामे केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, एप्रिल २०२० पासून लडाख येथील सीमेवरून भारत आणि चीन यांच्यात तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत अनेकदा दोन्ही देशांच्या सैन्यस्तरावर चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहे. परंतु, सीमावादावर कोणताही तोडगा निघालेला नाही.