नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील आंदोलक पैलवानांची आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरूच आहे. २३ एप्रिलपासून पैलवान आंदोलनाला बसले आहेत. आंदोलकांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांना अटक न केल्यास पदके परत करण्याचे संकेत दिले आहेत.
आम्ही मागील २५ दिवसांपासून जंतरमतरवर बसलो आहोत. त्यामुळे जर आमच्या तक्रारी ऐकल्या जात नसतील तर पदके किंवा अवॉर्डस यांचा काय उपयोग?, असा सवाल साक्षी मलिकने उपस्थित केला आहे. पैलवान यांच्या या भूमिकेवर ब्रिजभूषण सिंह यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पदके परत करण्याच्या प्रश्नावर भाष्य करताना सांगितले की, पदकाची किंमत फक्त १५ रुपये आहे, जर तुम्हाला ते परत करायचे असेल तर करोडो रुपयांचे रोख बक्षीस देखील परत करा, असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, फेडरेशन, सरकार आणि जनतेने खेळाडूंना जो पैसा दिला, प्रत्येक गावात त्यांना मान मिळाला आहे. त्याची किंमत काही कोटी रुपये आहे. खेळाडूंनी ते परत करावे. त्यानंतर त्यांच्या पदकांचा विचार केला जाईल. तसेच या खेळामूळे काही जणांना सरकारी नोकरीही मिळाली आहे, असं ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितले. पदके परत केली तर काय होणार?, सर्व व्याजासह सर्व पैसे परत करायला हवे, असं ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) शनिवारी भारतीय कुस्ती महासंघाच्या सचिवांना सर्व अत्यावश्यक कागदपत्रे हंगामी समितीकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. आयओएच्या या कृतीमुळे कुस्ती महासंघाचे सर्व कामकाज हंगामी समितीच पाहणार आणि मुदत संपलेल्या पदाधिकाऱ्यांची यात कोणतीच भूमिका नसेल, हे स्पष्ट होते. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध भारताचे आघाडीचे कुस्तीगीर आंदोलन करत आहे. त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर आयओएने क्रीडा मंत्रालयाच्या सुचनेनुसार कुस्ती महासंघाचे कामकाज चालवण्यासाठी आणि त्यांची निवडणूक पार पाडण्यासाठी हंगामी समितीची नियुक्ती केली.