नवी दिल्ली : प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्याला नव्या सरकारमध्ये मंत्रिपद नको आहे, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. नव्या सरकारच्या शपथविधी समारंभाच्या एक दिवस आधीच जेटली यांनी हे पत्र लिहून मंत्रीपद नाकारले आहे.जेटली यांनी आपल्या पत्राची प्रत ट्विटरवर टाकली आहे. जेटली हे अनेक दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे नव्या सरकारमध्ये त्यांच्या भूमिकेबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. त्यांच्या पत्राने या अंदाजांना आता पूर्णविराम मिळाला आहे.निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जेटली यांनी मोदींना तोंडी कल्पना दिली होती. उपचारासाठी वेळ हवा असल्यामुळे आपल्याला मंत्रीपद नको, असे त्यांनी मोदींना सांगितले होते. हीच भूमिका त्यांनी आता पत्राद्वारे जाहीररीत्या मांडली आहे. जेटली यांनी पत्रात म्हटले आहे की, मला माझ्यासाठी तसेच माझ्या आजारावरील उपचारासाठी वेळ द्या, अशी औपचारिक विनंती मी आपणास करीत आहे. नव्या सरकारमध्ये मला कोणतीही जबाबदारी देण्यात येऊ नये. सरकार व पक्षाचे अनौपचारिक समर्थन मात्र मी करीत राहीन.६६ वर्षीय जेटली यांना गेल्या आठवड्यात दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रिपद नको; जेटली यांचे मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 3:56 AM