नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित संघटनांना यापुढे आपण ‘संघ परिवार’ असे संबोधणार नाही, अशा आशयाचे ट्वीट काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांनी केेले आहे. उत्तर प्रदेशात ख्रिश्चन जोगिणींना देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीचा संदर्भ राहुल यांच्या या ट्वीटला आहे.
नवी दिल्लीहून ओडिशाला जात असलेल्या चार जोगिणींना झाशी रेल्वे स्थानकावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या जोगिणींबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाणार असल्याचा आरोप करत या कार्यकर्त्यांनी जोगिणींना रोखण्याचा प्रयत्न केला. हा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेचे आसूड ओढले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्याशी संबंधित संघटनांना परिवार संबोधणे चुकीचे ठरेल. कारण परिवारात महिला व ज्येष्ठांप्रती आदर आणि प्रेम दाखवले जाते; परंतु संघ परिवारात तसे काही आढळत नाही. म्हणूनच संघ आणि संघाशी संबंधित संघटनांना परिवार संबोधणे चुकीचे ठरेल, असे ट्विट राहुल यांनी केले. आपण यापुढे ‘संघ परिवार’ असा उच्चार करणार नाही, असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले.