पाटणानितीश कुमार सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. पण मंत्रिमंडळात एकही मुस्लिम आमदाराला स्थान मिळालेले नाही. इतकंच नव्हे तर बिहारमध्ये सत्ता स्थापन केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) एकही मुस्लिम आमदार नाही. बिहारमध्ये भाजप, जदयू, हिंदूस्तान आवाम मोर्चा (सेक्यूलर) आणि विकासशील इन्सान पार्टी या पक्षांचा समावेश असलेल्या एनडीएने बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन केली आहे. पण या सरकारमध्ये एकही मुस्लिम आमदार नसल्याचे समोर आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आतापर्यंत पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये एकूण लोकसंख्येमध्ये १६ टक्क्यांहून अधिक मुस्लिम जनता आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या 'जदयू'कडून यावेळीच्या निवडणुकीत एकूण ११ मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पण ते सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. कॅबिनेट मंत्र्यांच्या शपथविधीवेळी नितीश कुमार यांना एका मुस्लिम उमेदवाराला मंत्रिमंडळात स्थान देण्याची संधी होती. त्यानंतर विधान परिषदेवर त्या उमेदवाराला निवडून आणता आलं असतं. पण तशीही भूमिका नितीश कुमार यांनी घेतली नाही.
राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांच्यासह एकूण १५ मंत्र्यांना पद आणि गोपनियतीची शपथ दिली. यातील चार मंत्री हे उच्चवर्णीय, चार मागास जातींचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. तर तीन अत्यंत मागासवर्गीय आणि तीन अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व करणारे आहेत.
घटनात्मक तरतुदीनुसार बिहार मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ३६ सदस्यांची मंत्रीपदी नियुक्ती करता येऊ शकते. नितीश यांच्या मंत्रिमंडळात अजूनही २१ जणांची जागा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला स्थान दिलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
बिहारच्या निवडणूक निकालात सत्ताधारी एनडीएने १२५ जागांवर यश मिळवत सत्तास्थापनेचा दावा केला. तर महागठबंधनला ११० जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे महागठबंधनमध्ये 'राजद'ला सर्वाधिक ७५ जागांवर यश मिळालं आहे. तर भाजप ७४ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जदयूला ४३ जागा मिळाल्या, तर काँग्रेसच्या पदरात १९ जागांवर यश मिळालं आहे.