नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये असलेल्या सेक्टर 58 मधील एका पार्कमध्ये मुस्लीम नागरिकांना नमाज पठण करण्यास मनाई करण्यात आली आहे. येथील स्थानिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत सेक्टर 58 मधील पोलिसांनी पार्कमधील खुल्या जागेचा वापर कोणत्याही धार्मिक विधींसाठी करण्यास मनाई असल्याचे कारण देत याठिकाणी नमाज पठण करता येणार नाही, असा आदेश जारी केला आहे.
या पार्कमध्ये सुरुवातीला 15-20 मुस्लीम नागरिक नमाज पठण करण्यासाठी येत होते. मात्र, नंतर ही संख्या वाढत गेली आणि जवळपास 200 मुस्लीम नागरिक याठिकाणी नमाज पठण करण्यासाठी येते होते. त्यामुळे या पार्कमध्ये फिरायला येणाऱ्या नागरिकांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. दरम्यान, या पार्कमध्ये नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती, मात्र दंडाधिकाऱ्यांनी त्याला नकार दिला होता.
या पार्कच्याजवळ असेलल्या परिसरात अनेक कंपन्या आहेत. मुस्लीम कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केले तर त्यासाठी कंपन्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे नोएडा पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच, कंपन्यांनी त्यांच्या मुस्लीम कर्मचाऱ्यांना पार्कमधील मोकळ्या जागांवर शुक्रवारचे नमाज पठण बंद करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, 19 डिसेंबरला या पार्कमध्ये नमाज पठण केल्याप्रकरणी नौमान अख्तर यांच्यासमवेत दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांची शनिवारी जामिनावर सुटका करण्यात आली. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती, असे पोलिसांनी यावेळी सांगितले.