दिल्लीराजधानी दिल्लीमध्ये करोनाचा कहर काही थांबताना दिसत नाहीय. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच दिल्लीतील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूंचं प्रमाण पाहता राजधानीत पुन्हा एकदा लॉकडाउनच्या चर्चेने जोर धरला आहे. पण दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंत जैन यांनी लॉकडाउनचे वृत्त फेटाळून लावले आहे.
'पुन्हा लॉकडाउन करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. फक्त हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी काही निर्बंध लादले जाऊ शकतात. सध्या दिल्लीत जास्तीत जास्त कोविड चाचण्या केल्या जात आहेत. त्यात आणखी वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे', असं सत्येंद्र जैन म्हणाले.
दिल्लीत सध्या करोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येने जोर धरला आहे. त्यात छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर गर्दी झाल्यास करोनाचा फैलावास वाव मिळण्याची शक्यता आहे. 'छठ पूजेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातून सहज व्हायरस पसरला जातो. त्यामुळे काही निर्बंध घालणे आवश्यक आहे', असंही जैन म्हणाले.
केजरीवालांनी केंद्राकडे केली लॉकडाउनची मागणीदिल्लीतील करोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे बाजार क्षेत्रात लॉकडाउन करण्याची मागणी केली होती. 'करोनाचा हॉटस्पॉट ठरू शकतात अशा बाजार क्षेत्रात लॉकडाउनची मागणी करण्यासाठीशी शिफारस केंद्राकडे केली आहे', असं केजरीवाल यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्लीत लॉकडाउन होणार अशा चर्चेने जोर धरला होता. अखेर बुधवारी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीत अजिबात लॉकडाउन केलं जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.
एनसीआर भागात रॅपिड टेस्टिंगदिल्लीतील वाढती रुग्णसंख्या पाहता एनसीआर भागातही सावधगिरी बाळगली जात आहे. नोएडा प्रशासनाने डीएनडी उड्डाणपूल आणि चिल्ला बॉर्डरवर नोएडाकडे जाणाऱ्या लोकांची रॅपीड टेस्टिंग करण्यास सुरुवात केली आहे.
दिल्लीत करोनाचा हाहा:कारदिल्लीत मंगळवारी करोनाचे ६,३९६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या आता ४.९५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. तर आतापर्यंत ७,८१२ जणांचा मृत्यू झाला आहे.