मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे जनक खासदार शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यामध्ये पवार यांनी महाविकास आघाडी, काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार आणि मोदींसोबतच्या बैठकीवरील प्रश्नांना स्पष्टपणे उत्तरे दिली. हिंदुत्ववादी संघटना किंवा पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते. मात्र, शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच, सुप्रिया सुळेंच्या मंत्रिपदाबाबतही स्पष्ट शब्दात सांगितले.
मोदींनी एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. तुमच्यासोबत काम करण्यास मला मनापासून आनंद होईल, असं मोदींनी सांगितलं होतं. तसेच सुप्रिया सुळेंनाही मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यास मला आनंद होईल, असे पवारांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. पण, मी त्यांना सांगितलं एकत्र काम करणं राजकीयदृष्ट्या मला शक्य नाही. मला भाजपानं राष्ट्रपतीपदाची ऑफर दिलेली नव्हती, हे काही खरं नाही, माझ्या मनातही तसं नव्हतं, असंही पवारांनी स्पष्ट केले होतं. त्यानंतर पुन्हा इंडियन एक्सप्रेसने पवारांना सुप्रिया सुळेंच्या मंत्रिपदाचा प्रश्न विचारला होता, त्यावर पवारांनी घडलेला प्रसंग सांगितला. तसेच, मोदींकडून थेट ऑफर नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मोदींनी सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली होती का? यावर उत्तर देताना, नाही.. नाही... असे म्हणत पवारांनी घडला प्रसंग व्यक्त केला. ''सुप्रिया सुळे चांगलं काम करत असून गेल्या 5 वर्षांपासून त्या उत्कृष्ट संसदपटू आहेत. तुमच्यासोबत त्यांचा वेळ वाया नाही घालवला पाहिजे, असं (जोक्स ऑफ द पार्ट) मोदींनी मला म्हटलं होतं. त्यांनी आपला वेळ वाया घालवू नये, त्यांच्या कामाचा उपयोग देशपातळीवर होईल,'' असे मोदींनी आमच्या भेटीदरम्यान म्हटल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर, केंद्रात सक्रिय असलेल्या आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रीय कृषी मंत्रिपद द्यावे आणि राज्यातील नेतृत्व बदलावे. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी नको, अशी मागणी पवारांनी केली होती. मात्र या दोन्ही मागण्यांसाठी भाजपाने नकार दिला होता, असं वृत्त अनेकांनी दिलं होतं. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आलं. त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी आपल्या मुलाखतीत या सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत.