- भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पंसतीस उतरली असून महाराष्ट्रासह देशभरात अनेक मार्गांवर ही ट्रेन सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत ट्रेन म्हणून मुंबई ते सोलापूर मार्गावर ही हायस्पीड ट्रेन धावली. सुपरफास्ट एक्सप्रेसच्या एक पाऊल पुढे म्हणून वंदे भारत ट्रेनकडे पाहिले जाते. या ट्रेनमधील सुविधा, स्वच्छता आणि गतीमान प्रवासामुळे प्रवाशांनी ट्रेनमधून प्रवास करण्याला पसंती दिली. मात्र, ट्रेनचे तिकीट दर व जेवण यावरुन नेहमीच टीकेचा सामना रेल्वे विभागाला करावा लागतो.
वंदे भारत ट्रेन यशस्वी झाल्यामुळे लवकरच वंदे भारत स्लीपर व्हर्जनही सादर केले जाणार आहे. यावर वेगाने काम सुरू आहे. तर, विद्यमान वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने, आणखी काही मार्गांवर ही ट्रेन प्रवाशांसाठी सेवेत दाखल होणार आहे. अशातच आता भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीवर काम करत असून, याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वत:च माहिती दिली. वंदे भारत ट्रेनचा सत्ताधारी नेत्यांकडून मोठा गवगवा केला जातो. तसेच, बुलेट ट्रेनच्या धर्तीवर ही ट्रेन सुरू झाल्याचंही सांगण्यात येतं. मात्र, ट्रेनमधील जेवणाच्या गुणवत्तेवर नेहमीच प्रश्न उपस्थित होत आहेत.
सोशल मीडियातून या ट्रेनचं मोठं कौतुक झालं, पण याच सोशल मीडियातून प्रवाशी तक्रारीही मांडताना दिसून येतात. कपिल नावाच्या एका ट्विटर युजरने वंदे भारत ट्रेनमधील जेवणाच्या निकृष्ट दर्जासंदर्भात पोस्ट केली आहे. विशेष म्हणजे या प्रवाशाने ट्रेनमधील जेवणाचे फोटो शेअर करत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पोस्टमध्ये मेन्शन केलं आहे. ''रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी हेल्दी फूड दिल्याबद्दल धन्यवाद. त्यात ना तेल, तिखट ना मसाला, असे हे वंदे भारतमधील जेवण, अशा आशयाचा मजकूरही प्रवाशाने लिहिला आहे. कपिल यांनी छोलेच्या भाजीचा एक फोटो शेअर केला असून हे छोले अगदी पातळ रस्स्यात दिसत आहेत. कपिल यांच्या ट्विटवर अनेकांनी मत व्यक्त करत रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्रालायावर जोरदार टीका केली आहे. तर, काहींनी मिश्कील टोलाही लगावला आहे.
दरम्यान, कपिल यांनी १९ फेब्रुवारी रोजी हे ट्विट केले असून त्यास २.४ मिलियन्स व्हूज म्हणजे २४ लाख लोकांनी ते पाहिले आहे. तर, हजारो युजर्सने कमेंट करुन रेल्वे विभागाला संबंधित जेवणावर प्रश्न विचारले आहेत.