नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते काश्मीरमधील सद्यपरिस्थिती आणि तेथील फुटिरतावाद्यांची भूमिका यासंदर्भात माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. विशेष म्हणजे तत्पूर्वीच देशापेक्षा कुणीही मोठं नसल्याचं शाह यांनी म्हटलं आहे. शाह हे 26 आणि 27 तारखेला काश्मीरमध्ये असणार आहेत.
केंद्रीय बजेटची व्यस्त वेळ लक्षात घेऊनच शाह यांचा दौरा अलिकडे घेण्यात आला आहे. यापूर्वी 30 जून रोजी काश्मीरसाठी त्यांचा दौरा आखण्यात आला होता. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात शाह हे उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसेच काश्मीरमधील भाजपा नेते आणि पंचायत समिती सदस्यांनाही ते मार्गदर्शन करणार आहेत. तर, राज्यपाल सत्यपाल मलिक यांचीही भेट अमित शाह घेणार आहेत. या भेटीत काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेसंदर्भात ते चर्चा करतील. तत्पूर्वीच, फुटरतावाद्यांना शाह यांनी दम भरला आहे. देशापेक्षा कुणीही मोठा नसल्याचे सांगत, फुटीरतावाद्यांना त्यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे. फुटीरतावाद्यांशी चर्चा करणार नसून त्यांची कुठलिही अट मान्य करणार नसल्याचे शाह यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, येथील हुर्रियत या फुटीरदावादी संघटनेचे काही नेते तिहार तुरुंगात बंद आहेत. या तुरुंगातील नेत्यांची सुटका करण्याची मागणी फुटीरतावादी नेत्यांकडून होणार आहे, अशी गुप्त माहिती शाह यांनी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर शाह यांनी आपली भूमिक स्पष्ट केल्याचे समजते. गृहमंत्री बनल्यानंतरचा अमित शाह यांचा हा पहिला काश्मीर दौरा आहे.