गृहमंत्री अमित शाहअरुणाचल प्रदेश दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी सोमवारी अरुणाचल प्रदेशातून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आमच्या जमिनीवर कोणीही कब्जा करू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले. याशिवाय, भारत-चीन सीमेजवळील किबिथू गावात चीनचे नाव न घेता अमित शाह म्हणाले की, आज संपूर्ण देश शांततेत झोपला आहे, कारण आमचे आयटीबीपी जवान आणि लष्कर रात्रंदिवस सीमेवर पहारा देत आहेत. आमच्याकडे वाईट नजर टाकण्याची कोणाची हिंमत नाही.
अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' (व्हीव्हीपी) सुरू केला. गृहमंत्री झाल्यानंतर अमित शाह यांचा अरुणाचल प्रदेशचा हा पहिलाच दौरा आहे. ते म्हणाले, 2014 पूर्वी संपूर्ण ईशान्य प्रदेश हा अशांत क्षेत्र म्हणून ओळखला जात होता. पण, गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे ईशान्य हा देशाच्या विकासात योगदान देणारा प्रदेश मानला जातो.
अमित शाह म्हणाले, "21 ऑक्टोबर 1962 रोजी कुमाऊँ रेजिमेंटचे तत्कालीन 6 अधिकारी येथे शौर्याने लढले आणि ज्यांच्या सहाय्याने भारताच्या भूमीचे रक्षण होऊ शकले, मला त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे. त्यांची संख्या आणि शस्त्रेही कमी होती. पण 1963 मध्ये टाईम मॅगझिनमध्ये असे लिहिले होते की, किबिथू येथे झालेल्या लढाईत भारतीय सैन्याकडे कमी शस्त्रे होती, परंतु संपूर्ण जगातील सैन्यांमध्ये सर्वात जास्त शौर्य होते."
याचबरोबर, पूर्वी सीमाभागात येणारे लोक म्हणायचे की, ते भारताच्या शेवटच्या गावातून आलो आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे नॅरेटिव्ह बदलले आहे. आता इथून गेल्यावर लोक म्हणतात की, मी भारतातील पहिल्या गावातून आलो आहे, असेही अमित शाह म्हणाले. दरम्यान, 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' अंतर्गत, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश लडाखमधील उत्तर सीमेवरील 19 जिल्ह्यांच्या 46 ब्लॉकमध्ये 2967 गावे विकसित केली जाणार आहेत.