नवी दिल्ली : जगातील कोणतीही शक्ती भारतीय सैनिकांना लडाखमध्ये देशाच्या सीमेवर गस्त घालण्यापासून रोखू शकत नाही, असा कडक इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी चीनला दिला.पूर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरीचे प्रयत्न सुरू ठेवले असून, त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. त्यासंदर्भात राज्यसभेत केलेल्या निवेदनात राजनाथसिंह यांनी सांगितले की, सीमेवर चीनने सैन्याची मोठी जमवाजमव केली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज झालाआहे.लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातील सीमारेषेची स्थिती चिनी सैनिकांनी २९ आॅगस्टच्या मध्यरात्री बदलण्याचा प्रयत्न केला. भारत व चीन हे तणाव कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा करीत होते, नेमके त्याचवेळी चीनच्या लष्कराकडून भारताविरोधात कुरापती सुरू होत्या. त्यामुळे चीनची उक्ती व कृती यात असलेले अंतर सर्वांनाच दिसूनआले.पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये चिनी सैनिक व भारताच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. तेव्हापासून दोन्ही देशांतील तणाव खूप वाढला आहे. त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह म्हणाले की, भारताच्या शूर जवानांनी आपले प्राण पणाला लावून मातृभूमीचे रक्षण केले आहे. चीनच्या कुरापती सुरू असूनही भारतीय लष्कराने संयम बाळगला होता व योग्य वेळ येताच चीनचा शौर्याने मुकाबला केला.सभागृहात जाहीर चर्चा न करण्यावर एकमतगलवानमध्ये काही ठिकाणी भारतीय जवानांना गस्त घालण्यास चीनने विरोध केला. त्याबद्दल काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के. अॅन्टोनी यांनी विचारलेल्या प्रश्नाला राजनाथसिंह यांनी सविस्तर उत्तर दिले. चीनबरोबरचा तणाव हा संवेदनशील विषय असून, त्यावर संसदेत चर्चा न करण्याबाबत सरकार व विरोधी पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र, या तणावाबाबत राजनाथसिंह यांनी १५ सप्टेंबर रोजी लोकसभेत केलेल्या निवेदनाबाबत काही प्रश्न विचारण्यास राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी खासदारांना अनुमती दिली होती.
सीमेवर गस्त घालण्यापासून भारतीय जवानांना कोणीही रोखू शकत नाही- राजनाथसिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 5:56 AM