ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ३० - बीफच्या मुद्यावरुन देशभरात गदारोळ सुरू असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 'मला बीफ खायचे असल्यास मी ते खाणारच, मला कोणीही त्यापासून रोखू शकत नाही' असे विधान केले असून त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. बीफच्या मुद्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात विनाकारण महत्व दिले जात असल्याचे सांगत दादरी येथे घडलेल्या घटनेमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
'मी आत्तापर्यंत कधीच बीफ खाल्लेलं नाही, पण जर मला त्याची चव आवडली आणि जर मला ते खायचे असेल तर मी ते खाणारच. ( ते खाण्यापासून) मला कोणीही थांबवू शकत नाही' असे कर्नाटक युवा काँग्रेसच्या सर्वसाधारण सभेत बोलताना ते म्हणाले. देशात अशाप्रकारे घालण्यात आलेली बंदी विचित्र असल्याचेही सांगत त्यांनी बीफ बंदीवर कडाडून टीका केली. तसेच दिल्लीत केरळ भवनमध्ये गोमासांच्या मुद्यावरून पोलिसांनी चौकशी सुरू केली, त्यावेळी मी दिल्लीतच होतो, मात्र या सर्व प्रकाराबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काहीच माहिती नव्हती असे त्यांनी सांगितलं.
लोकांना जे आवडतं ते पदार्थ खाण्यापासून कोणी कसं रोखू शकत? असा सवाल विचारत गो मांसाच्या मुद्यावरून देशात सुरू असलेल्या गोंधळामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली तसेच केरळ हाऊसवरील पोलिसांच्या छाप्याचा निषेध नोंदवला.