पाटणा : संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. उद्या दुपारी 4 वाजता कुमार यांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तर, भाजप नेते सुशील कुमार मोदी हे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मोदी याआधीच्या मंत्रिमंडळातही उपमुख्यमंत्री होते. आज पाटण्यात झालेल्या एनडीएच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. सुशील कुमार मोदींनी यासंदर्भात ट्विट करुन भाजपाने गेल्या 40 वर्षांत दिलेल्या जबाबदाऱ्यांबद्दल ट्विट केलंय.
सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आज पाटण्यात एनडीएची महत्त्वाची बैठक झाली. तत्पूर्वी संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) बैठकीत नितीश कुमार यांची विधिमंडळ दलाच्या नेतेपदी निवड झाली. दुसऱ्या बाजूला भाजप नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर जेडीयू आणि भाजपच्या नेत्यांची संयुक्त बैठक झाली. त्यात नितीश कुमार हेच एनडीए सरकारचे मुख्यमंत्री असतील, यावर शिक्कामोर्तब झालं. तसेच, उपमुख्यमंत्रीपदी सुशीलकुमार मोदी यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, अद्यापही निश्चित न झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
सुशील कुमार मोदींनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, भाजपा आणि संघ परिवाराने गेल्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात मला जेवढं दिलंय, तेवढं कदाचितच इतर कोणाला दिलं असेल. यापुढेही जी जबाबदारी मिळेल ती स्विकारेन. कार्यकर्त्याच पद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, असे ट्विट सुशील कुमार मोदींनी केले आहे.
सुशील कुमार मोदींच्या ट्विटचा अर्थ नेमका कसा घ्यायचा हा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण, कार्यकर्ता हे पद माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाह, असे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, उपमुख्यमंत्रीपदी त्यांना संधी मिळेल, की नवा चेहरा येईल हे लवकरच स्पष्ट होईल.
पाटण्यात झालेल्या एनडीएच्या बैठकीला एनडीएतील चारही पक्षांचे (जेडीयू, भाजप, हम, व्हीआयपी) महत्त्वाचे नेते उपस्थित होते. नितीश यांचा शपथविधी उद्या संपन्न होईल. नितीश यांच्या मंत्रिमंडळात याआधी काम केलेल्या अनेक मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी 4 वाजताच्या दरम्यान शपथविधी सोहळा आयोजित करण्यात येईल.