छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात घालण्यात आलेल्या धाडींसंदर्भात प्रतिक्रिया देताना ‘’मला हात लावण्याची कुणाची हिंमत नाही, मी मृत्यूलाही घाबरत नाही’’, असं विधान केलं आहे. इडीकडे कुठलाही ईसीआयआर क्रमांक नाही आहे, जेव्हा आम्ही याबाबत विचारलं तेव्हा त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. हे सर्व भाजपाचं कटकारस्थान आहे. आम्हाला त्रास देणं हेच त्यांचं काम आहे, असा आरोप भूपेश बघेल यांनी केला.
आज ईडीच्या एका पथकाने छत्तीसगडमधील मद्य घोटाळ्याप्रकरणी कारवाई करताना माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांच्या मुलाच्या अनेक मालमत्तांवर धाडी टाकल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना बघेल यांनी संताप व्यक्त करत सत्ताधारी भाजपावर टीकेची तोफ डागली.
भूपेश बघेड म्हणाले की, भूपेश बघेलला हात लावण्याची कुणाची हिंमत नाही आहे. भूपेश बघेल हा मृत्यूलाही घाबरत नाही. मला ना हरण्याची भीती आहे, ना मरण्याची भीती आहे. इडीकडे कुठलाही इसीआयआर क्रमांक नाही आहे. जेव्हा आम्ही याबाबत विचारले, तेव्हा त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. ७ वर्षांपूर्वी माझ्याविरोधात एक गंभीर आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणात काहीही सापडलं नाही, कारण त्या प्रकरणात मला सर्वोच्च न्यायालयाने मला दोषमुक्त केलं होतं. या प्रकरणातही यांना काहीही मिळणार नाही.