नवी दिल्ली: निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर पुढील काही दिवसांत काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. प्रशांत किशोर उद्या यासंदर्भात पक्ष नेतृत्त्वाशी संवाद साधतील. गेल्या काही दिवसांत प्रशांत किशोर यांनी अनेकदा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली आहे.
काँग्रेसला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी काही उपाय सुचवले आहेत. सोनिया गांधी आणि पक्षाचे काही वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी या संदर्भात एक प्रेझेंटेशन सादर केलं. या प्रेझेंटेशनमध्ये ६०० स्लाईड्स होत्या. किशोर यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीला उपस्थित असलेल्या एकाही व्यक्तीनं ६०० स्लाईड्स पाहिल्या नाहीत. या सर्व स्लाईड्स किशोर यांनी तयार केल्या होत्या.
प्रेझेंटेशनमध्ये नेमकं काय?२०१४ मध्ये भाजपसाठी रणनीती आखणाऱ्या प्रशांत किशोर यांनी आता काँग्रेससाठी काम सुरू केलं आहे. काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी यासाठी त्यांनी एक ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. किशोर यांनी सोनिया गांधींसमोर नुकतंच एक प्रेझेंटेशन दिलं. या प्रेंझेटेशनची सुरुवात महात्मा गांधींच्या एका विचारानं होते. 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला कधीही मरू देता कामा नये, ती केवळ देशासोबत मरू शकते.'
प्रशांत किशोर यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये भारताची लोकसंख्या, मतदारांची संख्या, विधानसभेच्या जागा, लोकसभाच्या जागा यांचे आकडे दिले आहेत. महिला, तरुण, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या संख्येचा उल्लेखदेखील यात आहे. २०२४ मध्ये १३ कोटी जण पहिल्यांदाच मतदान करतील. त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
सध्याची काँग्रेसची स्थिती काय?प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची सध्याची स्थिती प्रेझेंटेशनमधून मांडली आहे. त्यानुसार लोकसभा आणि राज्यसभेत मिळून काँग्रेसचे ९० खासदार आहेत. विधानसभांमध्ये ८०० आमदार आहेत. तीन राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. तीन राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत काँग्रेस सरकारमध्ये आहे. १३ राज्यांमध्ये काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष आहे. तर ३ राज्यांमध्ये काँग्रेस मित्रपक्षांसोबत मुख्य विरोधी पक्ष आहे.
काँग्रेसला सक्षम करण्यासाठी किशोर यांनी सुचवलेले पाच उपाय१. नेतृत्त्वाचा विषय सोडवावा लागेल.२. आघाडीचा मुद्दा सोडवावा लागेल.३. पक्षाला जुन्या सिद्धांतांवर काम करावं लागेल.४. प्रत्यक्षात जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्ते, नेत्यांची फौज तयार करावी लागेल.५. काँग्रेसच्या संवाद यंत्रणेत बदल करण्याची गरज