मुंबईतील शिवसेनेचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर यांच्या मेहुण्याने ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वापरल्याच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. यावरून निवडणूक आयोगाने आज मोठा खुलासा केला आहे. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही, असे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ कमालीचा चर्चेत आला आहे. शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांना केवळ ४८ मतांनी विजय मिळाला आहे. या मतमोजणीत आधी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर विजयी घोषित करण्यात आले होते. यानंतर काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. आता या मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ उठले आहे. पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करताच निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. यावर आयोगाने विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर दिले आहे.
निवडणूक आयोगाच्यावतीने रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नाही. तसेच ईव्हीएम यंत्र कशाशीही जोडले जात नाही, असे सांगितले आहे. आज आलेल्या बातम्यांवरून काही लोकांनी ट्विट केले आहे. चुकीची बातमी प्रसिद्ध केली आहे. ईव्हीएम ही स्वतंत्र प्रणाली आहे. आम्ही चुकीची बातमी दिल्यावरून वृत्तपत्राला नोटीस पाठविली आहे. आयपीसी 499 अंतर्गत मानहानीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या.
मी त्या पत्रकाराला समजविण्याचा प्रयत्नही केला होता. त्यांना आयपीसी ५०५ आणि ४९९ नुसार नोटीस पाठविली जाणार आहे. आयोगाचा अधिकारी गौरव यांना जो मोबाईल ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती तो त्यांचा स्वत:चा मोबाईल होता. पोलीस तपासानंतर आम्हीही अंतर्गत तपास करणार की नाही ते ठरविणार आहोत, असे त्या म्हणाल्या.
काय झाले आतापर्यंत...पोलिसांनी वायकरांचा मेहुणा मंगेश पंडीलकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याचबरोबर निवडणूक आयोगाचा कर्मचारी दिनेश गुरव याच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. मंगेश पंडीलकर हे मतमोजणीच्या खोलीत मोबाईल वापरत असल्याची तक्रार इतर उमेदवारांनी केली होते. त्यानंतर पोलिसांनी ४ जून रोजीच पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला होता. आता पोलीस तपासात पंडीलकर हे ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी हा मोबाईल वापरला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज असून, ते आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. हे फुटेज पोलीस आजपासून तपासणार आहेत. या फोनमधील नंबरचा सीडीआरही तपासला जात आहे.