ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने भारताला समन्स बजावले आहे. भारताविरुद्ध उलट्या बोंबा मारत एकप्रकारे नापाक हरकत केली असेच म्हणावे लागले. भारताने बटाल, जांदरोट आणि कोटली सेक्टरमध्ये केलेल्या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. पाकिस्तानचे महासंचालक मोहम्मद फैसल यांनी भारतीय उप-उच्चायुक्त जे पी सिंग यांच्याकडे याबद्दल निषेध व्यक्त करत भारताला समन्स बजावले आहे. भारताकडून जाणुनबुजून नागरिकांना लक्ष्य करत असल्याचाही आरोप पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने केला. तसेच भारताने 2003 सालच्या शस्त्रसंधीच्या कायद्याचा आदर करावा आणि सीमेवर शांतता राखावी, असे पाकिस्तानच्या या पत्रात म्हटले आहे.दरम्यान, आज (गुरुवारी) भारताने जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भीमबेर आणि बट्टल सेक्टरमध्ये करण्यात आलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाच पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत, तर सहा ते सात सैनिक जखमी झाले आहेत. लष्कराचे प्रवक्ता लेफ्टनंत कर्नल मनीष मेहता यांनी सांगितलं की, "पाकिस्तानी लष्कराने सकाळी साडे सात वाजता राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर मोर्टारने हल्ला करत गोळीबारदेखील केला". पाकिस्तानी सैनिकांनी सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील कृष्णाघाटी सेक्टरमध्येही गोळाबार केला असल्याचं त्यांनी सांगितलं.
ना"पाक" हरकत, भारताला दिला समन्स
By admin | Published: June 01, 2017 8:26 PM