नवी दिल्ली: भारतात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं केंद्र सरकारनं संसदेत सांगितलं होतं. त्यावरुन विरोधकांनी केंद्रावर प्रचंड टीका केली होती. पण, हा डाटा राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे असल्याचं स्पष्टीकरणही केंद्राकडून देण्यात आलं. त्यानंतर आता राज्य सरकारांनीही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू न झाल्याचं म्हटलं आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांकडून त्यांच्या राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूचा अहवाल मागितला होता. पण, पंजाब सोडून इतर सर्व राज्यांनी, त्यांच्या राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, फक्त पंजाबनेच राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एक मृत्यू झाल्याचं मान्य केलं आहे.
दुसऱ्या लाटेत अनेकांचा ऑक्सिजनमुळे मृत्यूमार्च 2020 मध्ये भारतात कोरोना महामारी पीकवर होती. काही महिन्यानंतर कोरोना कमी झाला, पण एप्रिल-मे 2021 मध्ये आधीपेक्षा कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्या दुसऱ्या लाटेत कोरोनासह बेड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. या मुद्द्यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला सळो की पळो केलं होतं. पण, आता पंजाबव्यतिरिक्त इतर सर्व राज्य सरकारं यावर चकार काढण्यास तयार नाहीत. तसेच, राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू न झाल्याचा अहवालही केंद्राकडे पाठवला आहे.