नवी दिल्ली : गेल्यावर्षी राजनाथसिंह यांचे पुत्र पंकज सिंग यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपांना मीडियाने चांगलीच प्रसिद्धी दिल्यानंतर सरकारने पाळलेले मौन राजनाथसिंह यांच्या जिव्हारी लागले आहे. गृहमंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत मोठी कपात केल्यामुळे पोलिसांच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया थांबवावी लागणार असताना एल. सी. गोयल यांची गृहसचिवपदी नियुक्ती करताना साधी सल्लामसलत केली न जाणे राजनाथसिंह जास्तच मनाला लावून घेतले. गोयल यांची नियुक्ती झाल्यानंतर केवळ राजनाथ यांना माहिती देण्यात आली. गोयल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे खास निकटस्थ असून केरळ कॅडरचे आहेत. गुप्तचर विभाग तांत्रिकदृष्ट्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येत असला तरी तो गृह मंत्रालयाचे काही एकत नाही, अशी स्थिती आहे. गडकरींच्या घरी काय झाले? केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी २३ मार्च रोजी झालेल्या चर्चेत भाजपच्या कारभारावर विस्तृत चर्चा झाली. भय्याजी जोशी, दत्तात्रय होसबळे, कृष्णन गोपाल ही रा. स्व. संघाची बडी मंडळी चर्चेत सहभागी झाली होती. पक्ष कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारा अन्य कुणी हवा आहे, असा सूर या बैठकीत व्यक्त झाला. स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ आणि किसान संघ या संघ परिवारातील अग्रणी संघटनांनी भूसंपादन विधेयक आणि अन्य मुद्यांवर मोदी सरकारवर जाहीररीत्या केलेली टीका हाही चर्चेचा विषय होता. गडकरी यांनीही सरकार आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे कळते. (विशेष प्रतिनिधी)
कोणतीच किंमत नाही - राजनाथ सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2015 4:28 AM