बंगळुरू: आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानाने आपल्या कार्यालयाचा वापर विरोधकांवर टीका करण्यासाठी केला नव्हता. याउलट नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाला दिवसरात्र याच कामासाठी जुंपले आहे. पंतप्रधानांनी इतक्या खालच्या पातळीला जाणे, योग्य नाही. ते देशासाठीही योग्य नव्हे, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही सडकून टीका केली. सरकारच्या या धोरणांमुळे लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. काही दिवसांपूर्वी रोख चलनाच्या पुरवठ्याअभावी एटीएममध्ये खडखडाट पाहायला मिळाला होता. ही परिस्थिती टाळता आली असती. नोटबंदीचा निर्णय व जीएसटीची घाईघाईत केलेली अंमलबजावणी या मोदी सरकारच्या काळातील दोन घोडचुका आहेत. त्यामुळे देशातील लघू व मध्यम उद्योगांना फटका बसून अनेकांना रोजगार गमवावे लागले, अशी टीकाही यावेळी मनमोहन सिंग यांनी केली.
मनमोहन सिंग यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे:1. मोदी सरकारने लोकशाही पद्धतीने होणारी चर्चा थांबवली.2. समस्यांवर चर्चा करण्याऐवजी मोदी सरकारने धमकावयाला सुरूवात केली. 3. भारताची रचना ही जटील आणि व्यापक आहे. त्यामुळे एकटा माणूस हे सर्व हाताळू शकत नाही. 4. जेव्हा जेव्हा सरकारच्या चुकांकडे लक्ष वेधले जाते तेव्हा सरकार इतरांच्या चुका शोधून त्यांना अडचणीत आणायला बघते.5. मोदी सरकार फक्त बड्या घोषणा करते. मात्र, त्याची अंमलबजावणी शून्य असते.